बेंगळुरू – भारताच्या संघातून डच्चू मिळालेल्या मुंबईकर अजिंक्य रहाणेला आयपीएल स्पर्धेत कोणताही संघ खरेदी करणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र, त्याच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवताना अखेर कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाने त्याला आपल्या संघात घेतले आहे.
रहाणेची बेस प्राइस 1 कोटी रुपये होती. त्याला त्याच किमतीला केकेआरने विकत घेतले. केकेआर वगळता अन्य कुठल्याही संघाने रहाणेवर बोली लावली नाही. त्याचा सध्याचा सुमार फॉर्म हेच त्यामागचे कारण होते.
भारताच्या कसोटी संघातून रहाणेला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार याचे संकेत मिळाल्यानंतर त्याला रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याची सूचना करण्यात आली होती. त्याचवेळी त्याने माध्यमांसमोर आपले नैराश्यही व्यक्त केले होते. मात्र, त्याचवेळी त्याने आयपीएल स्पर्धेत खेळण्याबाबतही रस दाखवला होता.