नवी दिल्ली – देशातील पहिली मेसेंजर आरएनए करोना लस जवळपास तयार झाली आहे. ही लस पुण्यात तयार झाली आहे. ही लस पुण्यातील जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स यांनी विकसित केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये ही लस वापरास येऊ शकते, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची गुरुवारी देशातील करोना परिस्थितीसंदर्भात पत्रकार परिषद झाली. यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करोना स्थितीची माहिती देण्यात आली. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून तिसरी लाट ओसरल्याचे सांगण्यात आले आहे.
व्ही. के. पॉल म्हणाले, वर्षभरापासून देशात करोना लसीकरण सुरु झाले आहे. करोना महामारीला रोखण्यासाठी लसीकरण एक महत्त्वाचे शस्त्र ठरत आहे. जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचेही लसीकरण सुरु झाले आहे. देशातील 96 टक्के लोकांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. देशातील करोनाची तिसरी लाट ओसरली आहे. पण लोकांनी काळजी घ्यावी. काही राज्यात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळत आहे. पण एकूण देशातील परिस्थिती आटोक्यात आल्याची चिन्हे आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मेसेंजर आरएनएम्हणजे काय?
पारंपरिक लसींद्वारे जिवंत किंवा मृत विषाणू आपल्या शरीराच्या रक्तप्रवाहात प्रवेश करतात. तसेच त्यात अनेक पदार्थ असतात, जे प्रतिरोधक प्रक्रियेच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात. पण कोविड-19 साठी नवीन लस “मेसेंजर आरएनए’ येत आहे जी एक प्रकारची न्यूक्लिक ऍसिड आहे. त्याला mRNAअसेही म्हणतात. हा मेसेंजर आरएनए अनुवांशिक यंत्रणेचा संकेत देतो ज्याद्वारे कोविड अँटीबॉडीज तयार होतात आणि ते विषाणूंना नष्ट करतात. म्हणजेच, या प्रक्रियेत लस थेट शरीरात टोचली जात नाही.