सातारा – येथे जिल्ह्यात करोनाचा विळखा अधिक घट्ट बनत आहे.जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी मिळून 113 जण करोना पॉझिटिव्ह आले आहेत.18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 95 उपचार घेत आहेत.
सातारा जिल्हा परिषदेने करोना संकटाचा मोठ्या निकराने सामना केला आहे.पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने बाधित आले होते. विविध विभागांच्या तीस कर्मचाऱ्यांना मृत्यूचा सामना करावा लागला होता. तिसऱ्या लाटेत महिन्यात मोठ्या प्रमाणात बाधित वाढले आहेत.काही पदाधिकारी, अधिकारी पण पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा परिषद आणखी सतर्क झाली आहे.
दि.15 डिसेंबर ते 18 जानेवारी या कालावधीत कराड पंचायत समिती चार, कोरेगाव पाच, खटाव सात,खंडाळा 15, जावळी चार, पाटण चार, फलटण 20, महाबळेश्वर 10, माण 13, वाई 19,सातारा पंचायत समिती 12 असे 113 करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
अनेक अधिकारी,कर्मचारी करोना पॉझिटिव्ह येऊ लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अनेक अधिकारी, कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने या कार्यालयात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेत अभ्यंगताना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करत असून नागरिकांनी सूचनांचे पालन करावे.
मनोज जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी