किंग्स्टन -पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात आयर्लंडने पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून विजय मिळविला. या विजयासह आयर्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता दोन्ही संघांमध्ये तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी(दि.16) होणार आहे.
वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 48 षटकांमध्ये 229 धावा केल्या. तळाच्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे विंडीजला 200चा आकडा पार करता आला. आठव्या क्रमांकावर आलेल्या रोमारियो शेफर्डने 41 चेंडूंमध्ये 50 धावा फटकावल्या.
त्याला ओडियन स्मिथने सुरेख साथ दिली. त्याने केवळ 19 चेंडूंमध्ये धडाकेबाज 46 धावांची खेळी केली. आयर्लंडकडून ऍण्डी मॅक्ब्राइनने 36 धावांत 4 गडी बाद केले. तर क्रेग यंगने 3 आणि जोश लिटिलने 2 विकेट्स घेतल्या.
230 धावांचे लक्ष्य घेऊन आयर्लंडचा संघ मैदानात उतरल्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार आयरिश संघाला 36 षटकात 168 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. हे आव्हान आयर्लंडने 5 विकेट्स गमावत 33 षटकात पार केले. आयर्लंडकडून हॅरी टेक्टरने 54 धावांची नाबाद खेळी केली.