पुणे – नेहमी वैविध्यपूर्ण कथा, विषय मांडणारे अशी लेखक-दिग्दर्शक ‘महेश मांजरेकर’ यांची सिनेसृष्टीत ओळख आहे. त्यांनी सिनेव्यवसायाची गरज म्हणून व्यावसायिक सिनेमे बनवले; पण समाजातील वास्तविकता पडद्यावर प्रतिबिंबित करणारे मार्मिक सिनेमेही त्यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केले.
आता पुन्हा एकदा समाजाला आरसा दाखवणारा एक सिनेमा ते घेऊन येत आहेत. “नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ असं या सिनेमाचं नाव आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. उद्या शुक्रवारी म्हणजेच, दि. १४ जानेवारी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
सिनेमातील काही दृश्यांवर टीका झाली असून, राष्ट्रीय महिला आयोगानेही या दृष्यांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच, त्याविरोधात केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एका महिलेची आक्षेपार्ह स्थितीमधील दृश्य दाखवण्यात आली होती.
आणि याच मुद्द्यावरून आता महिला आयोगाची अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सिनेमाचे दिग्दर्शक ‘महेश मांजरेकर’ यांना नोटीस बजावली आहे. तसेच एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे. “नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ सिनेमातील काही सीन आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्ये काढण्यात यावीत, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
दरम्यान, हा सिनेमा दिवंगत ज्येष्ठ नाटककार, पत्रकार जयंत पवार यांनी लिहिलेल्या ‘वरन भात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथेवर हा सिनेमा आधारित असून सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी महेश यांनी सांभाळली आहे.