मुंबई – अमेरिका व्याजदरात लवकर वाढ करण्याचे संकेत मिळाल्यानंतर गुरुवारी शेअर बाजार निर्देशांकांत एक टक्का घट झाली होती. मात्र देशांतर्गत गुंतवणूकदारानी लगेच खरेदी सुरू केल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजाराचे निर्देशांक सावरले. तरीही अमेरिकेच्या व्याजदर वाढीमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार आगामी काळात विक्री वाढविण्याची शक्यता कायम आहे.
काल शेअर बाजार निर्देशांक कोसळले असताना परदेशी संस्थागत गुंतवणूकदारानी 1,926 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली असल्याची आकडेवारी शेअर बाजारांनी जारी केली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 142 अंकांनी वाढून 59,744 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.38 टक्क्यानी म्हणजे 66 अंकांनी वाढवून 17,812 अंकांवर बंद झाला.
एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर बजाज फिन्सर्व, महिंद्रा, बजाज फायनान्स, एचडीएफसी आणि टायटन या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेली. हॉंग कॉंग, दक्षिण कोरिया येथील शेअर बाजारातून सकारात्मक संदेश आले. तर चीन आणि जपानमधील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले होते. युरोपियन शेअर बाजारातून संमिश्र संदेश आले.
जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, देशात आणि परदेशात अनेक घडामोडी होणार असल्यामुळे आगामी काळात निर्देशांक अस्थिर राहण्याची शक्यता आहे. ओमायक्रॉन देशात आणि परदेशात कसे रुप धारण करतो, औद्योगीक उत्पादन व महागाईची आकडेवारी कशी असेल, कंपन्याचे ताळेबंद कसे असतील यावर निर्देशांकांची वाटचाल अवलंबुन राहणार आहे.
बॅंका, खत,आयटीकडे लक्ष
बाजारातील एकूण परिस्थिती पाहता आगामी काळात गुंतवणूकदार माहीती तंत्रज्ञान, खत कंपन्या व बॅंकांकडे लक्ष देण्याची शक्यता असल्याचे ईक्वीटी 99 या संस्थेचे विश्लेषक राहुल शर्मा यांना वाटते. निफ्टीला 17,850 अंकानंतर काही अडथळे येऊ शकतात. मात्र निफ्टीला 17,650 अंकावर तगडा आधार असल्याचे त्याना वाटते. परदेशी गुंतवणूकदारांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.