लखनऊ – उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठी घोषणा केली आहे. अखिलेश यादव म्हणाले की, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास 300 युनिट घरगुती वीज मोफत दिली जाईल आणि त्यासोबतच शेतकऱ्यांचे संपूर्ण सिंचन मोफत केले जाईल, अशी घोषणा अखिलेश यांदव यांनी केली आहे.
अखिलेश यादव म्हणाले, “पक्षाच्या जाहीरनाम्यात 300 युनिट वीज मोफत देण्याचे पहिले वचन समाविष्ट केले जाईल, उत्तर प्रदेशच्या लोकांना माहित आहे की सपा त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करते.” नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या निवासस्थानी आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अखिलेश यादव यांनी ही घोषणा केली.
अखिलेश यादव पुढे म्हणाले, उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीनंतर ज्या दिवसापासून सरकार बदलेल त्या दिवसापासून समाजवादी पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी नवीन वर्ष असेल. सत्ताधारी भाजपने आपल्या कुशासनामुळे समाजातील सर्व घटकांचे जगणे कठीण केले आहे, असेही अखिलेश यादव म्हणाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने जुलैमध्ये एक मोहीम सुरू करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात काय समाविष्ट करावे हे सुचवण्यास सांगितले होते. एकतर विजेचे प्रति युनिट दर कमी करावेत किंवा घरगुती ग्राहकांना मोफत वीज (मर्यादित) द्यावी, ही सर्वात मोठी मागणी होती.
यापूर्वी, समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अशी घोषणा करण्यात आली होती की, सपा सरकार अपघाताने सायकलस्वारांचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 5 लाखांची भरपाई देण्यात येईल.
यावेळी अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा अत्तर व्यापाऱ्यांच्या छाप्यांवरून भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, “देशातील लोक नोटांचे बंडल पाहत आहेत, अशी छापेमारी झाली. भाजपला समाजवाद्यांच्या घरांवर छापे टाकायचे होते मात्र, त्यांनी त्यांच्याच लोकांवर छापे टाकले, असेही अखिलेश यादव यांनी सांगितले.