पुणे – स्पोर्टस फिल्डस् मॅनेजमेंट आयोजित पहिल्या बालन करंडक अजिंक्यपद 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा रविवार 2 जानेवारी ते 28 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये लिजंडस् क्रिकेट मैदान, मुंढवा येथे होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन पुनीत बालन ग्रुपचे कार्यकारी संचालक पुनीत बालन यांच्या हस्ते होणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पोर्टस फिल्डस् मॅनेजमेंटचे संचालक सनी मारवाडी यांनी सांगितले की, 12 वर्षाखालील आणि युवा क्रिकेट खेळाडूंसाठी तसेच त्यांच्या गुणांना वाव व संधी देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला पुनीत बालन ग्रुप यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
पुण्यातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्या 12 वर्षाखालील स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 8 क्रिकेट क्लब सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे साखळी फेरीचे सामने 20 षटकांचे होणार आहेत. स्पर्धेचा उपांत्य फेरीचे सामने आणि अंतिम सामना 25 षटकांचा होणार आहे. त्यामुळे अशा अधिक षटकांच्या सामन्यांची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत 16 साखळी सामने होणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना 28 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला सन्मानचिन्ह आणि करंडक मिळणार आहे. याशिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज तसेच उदयोन्मुख खेळडू यांना करंडक व सन्मानचिन्ह तर, मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू याला करंडक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.