सरत्या वर्षाला निरोप आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करताना वातावरणात खरंच सुखद हवा असते. येणाऱ्या प्रसन्न दिवसांची चाहुल असते. जुन्या आठवणींना मनाशी घट्ट धरून, येणाऱ्यांचं स्वागत करायचं. जुन्यांना नवीनतेत शोधायचं आणि एक नवीन अनुबंध तयार करायचा आणि आपल्यातच मग्न राहायचं… किती सुंदर कल्पना आहे! निर्सगाकडून शिकलं पाहिजे. कितीही आघात झाले, कितीही संकटं आली तरी तो आपला विहितक्रम विसरत नाही. मावळत्या वर्षानं आपल्याला हीच तर शिकवण दिलेली आहे.
नवीन वर्षाची सुरुवात दाराशी उभी आहे. गेली दोन वर्षे करोना नावाच्या महाराक्षसाने सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. मोठमोठ्या शहरातील गर्दीने फुललेले रस्ते, बाजारपेठा स्तब्ध झाल्या. उद्याने, शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, नाट्यमंदिरे अक्षरश: अबोल झाली. एखाद्या मोठ्या निराशेचे किंवा भीतीचे सावट पसरलेले होते. असे असले तरी एका गोष्टीवर मात्र फारसा परिणाम झाला नव्हता. तो म्हणजे निसर्ग.
वातावरणात भयछाया असल्या तरी निसर्गात कसल्याही दशहतीचे सावट तर सोडाच, लवलेशही नव्हता. प्रत्येक बदल शांतपणे स्वीकारत तो आपल्या मार्गावर चालत होता. नद्या, तलाव, जंगल, पर्वत स्तब्ध होते, आपला मार्ग आक्रमित होते. ऋतुमान दिनक्रमानुसार बहरत होते. म्हणूनच वाटतं निसर्गापासून खूप शिकण्यासारखे आहे. येणारी वादळे अंगावर घेऊन, घट्ट पाय रोवून उभे राहणे. त्यासाठी अगदी जंगलात जाऊन सफारी करून शिकण्याची आवश्यकता नाही, तर आपल्या सभोवतालचा, अगदी घरच्या बागेत जरी नजर टाकली तरी ते शक्य होतं. आपल्या आत निसर्ग सामावून घेणं सर्वात उत्तम. मग बाहेर बघायचं कामच नाही. या वर्षात माणसा-माणसामधील नात्याची वीण घट्ट झाली.
असो, मागील वर्षात जे झालं गेलं गंगेला मिळालं. आज विचार फक्त करायचा तो उद्याचा. नवीन वर्षाचा. मावळत्या वर्षानं आपल्यापासून बऱ्याच गोष्टी, मोलाची माणसं, प्रसन्न व्यक्तिमत्त्वं, कर्तबगार व्यक्ती हिरावून घेतल्या. पण त्यांच्या पुण्यस्मरण आठवणी मनाशी जपून ठेवायच्या आहेत. सतत जागृत ठेवायच्या आहेत. प्रात:स्मरणीय अशा व्यक्तित्वांची सातत्याने आठवण करावी आणि वैचारिक धरोहर पुढील पिढीपर्यंत अगत्याने पोचवायचा आहे. दिलीपकुमार, बाबासाहेब पुरंदरे, सीडीएस बिपीन रावत, अशी मौल्यवान हिऱ्यासारखी माणसं!
ज्यांच्यापासून सर्व भारत देश पोरका झाला. एका ऐतिहासिक कालाखंडाचा अंत झाला, पण त्यांचं स्मरण कायम राहील. इतिहास त्यांची निश्चितच नोंद ठेवेल. त्यांना मनात ठेवून नव्या वर्षाचे स्वागत करूया! हे सारं आपण निर्सगाकडून शिकायला पाहिजे. कितीही आघात झाले, कितीही संकंट आली तरी तो आपला विहितक्रम विसरत नाही. 2021 नं आपल्याला हीच शिकवण दिलेली आहे.
सरत्या वर्षाला निरोप आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करताना वातावरणात खरंच सुखद हवा असते. येणाऱ्या प्रसन्न दिवसांची चाहुल असते. जुन्या आठवणींना मनाशी घट्ट धरून, येणाऱ्यांचं स्वागत करायचं. जुन्यांना नवीनतेत शोधायचं आणि एक नवीन अनुबंध तयार करायचा आणि आपल्यातच मग्न राहायाचं… किती सुंदर कल्पना आहे. नवीन वर्षाचे स्वागत याच मानसिकतेतून करायला हवं. एक समृद्धतेचा स्पर्श आपल्या व्यक्तिमत्त्वाला होतो. मग पाहा सकारात्मक ऊर्जा किती मिळते! मन प्रसन्न ठेवणे हाच नव्या वर्षाचा संकल्प असावा. प्रत्येकानं हा विचार अंमलात आणून कृतीत उतरवावा!
नवीन वर्षाचं स्वागत करताना काही गोष्टी ज्या अति महत्त्वाच्या आहेत, त्या आपल्याला कायम पाळाव्या लागणार आहे. त्या म्हणजे “दो गजकी दूरी मास्क है जरूरी,’ या करोना संरक्षणमंत्राचा जप सातत्याने करावा लागणार आहे. आचरणात आणणे देखील गरजेचे आहे. या मंत्राचा एवढा प्रभाव आहे. त्यातून आपली संरक्षण यंत्रणा सशक्त होण्यास मदत होणार आहे. शारीरिक अंतर, मास्क, सॅनिटायझर ही या नवीन वर्षाची अत्यावश्यक गरज आहे. कारण करोना संपलेला नाही. तो एक बहुरूपी आहे. वेगवेगळ्या रूपात जो आपल्याला भेटणारच आहे. त्याला घाबरायचे कारण नाही. पण काळजी घ्यायलाच हवी.
ही दक्षता बाळगत सर्व सज्जतेनं 2021 ला निरोप द्या! आनंदानं, हसत खेळत, 31 डिसेंबर साजरा करा. नवीन 2022 चं स्वागत करा! येणारं वर्ष सर्वांना चांगलं जाऊ द्या! नवीन वर्षाची चाहुल लागलेली आहे. चित्रपटगृह, बाजारपेठ, सहलीची ठिकाणं, रस्ते बहरू लागले आहेत. लोकांच्या मनावरील मरगळ दूर होते आहे. चेहरे आनंदात फुललेले आहेत. खरचं दोन वर्षांचे सावट दूर करूया. अरे हो परवा व्हॉट्सऍपवर एक पोस्ट होती.
सांताक्लॉज आरटीपीसीआर करतोय. खूप आनंद वाटला. आपल्यापासून बच्चाकंपनीला धोका नको अशी काळजी सांता घेणार! मुलांची मजा आहे. सहजच मनात एक विचार आला. सांताप्रमाणे प्रत्येक सणांच्या देवतेने करोना टेस्ट करावी का? सगळीच काळजी मिटेल. व्यंगचित्रकाराच्या कल्पना शक्तीला मनापासून दाद देते आहे. माऊलीच्या पसायदानाला स्मरून सर्व जगासाठी येणारं वर्ष आरोग्यपूर्ण जावं ही इच्छा! जो जे वांछिल, तो ते लाहो प्राणीजात. नवीन वर्षाच्या आरोग्यपूर्ण निरामय शुभेच्छा!
– अरुणा सरनाईक