नवी दिल्ली – बांधकामांवर बंदी आदेश लागू असताना दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे बांधकाम सुरूच ठेवल्याबद्दल तसेच या कामात धूळीच्या नियंत्रणाचे नियम तोडल्याबद्दल केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस जारी करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे.
दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की या प्रकल्पाच्या विरोधात आमच्याकडे असंख्य तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारींची आम्ही चौकशी केली तेव्हा त्यात बरेच तथ्य आढळून आले.
दिल्लीच्या प्रदुषणनियंत्रण समितीकडून केंद्र सरकारच्या बांधकाम विभागाला नोटीस जारी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे राय यांनी आज सांगितले. दिल्लीत सध्या प्रदुषणाची पातळी वाढली असल्याने दिल्ली सरकारने दिल्लीच्या परिसरात बांधकामांना परवानगी नाकारली आहे. परंतु हा बंदी आदेश धुडकाऊन सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे.