वॉशिंग्टन- भारतासह जगात सर्वत्रच आगामी कालावधीमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकलचे प्रमाण वाढणार आहे. पण ही इलेक्ट्रिक व्हेईकल चालवण्यासाठी जी बॅटरी लागते त्याच्या चार्जिंग बाबत मात्र अद्यापही काही समस्या निर्माण होत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता अमेरिकेमध्ये ज्या रस्त्यांवरून ही इलेक्ट्रिक वाहने धावतील ते रस्ते चार्जिंगचे काम करू शकतात का याबाबतचे संशोधन सुरू आहे या इलेक्ट्रिक व्हेईकलचा प्रवास सुरू असतानाच त्यांची बॅटरी चार्जिंग होण्याचे कामही चालू राहू शकते.
अमेरिकेसारख्या प्रगत देशातही अद्याप इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही. गेल्या वर्षभरात फक्त या वाहनांच्या विक्रीमध्ये चार टक्के वाढ झालेली आहे. बॅटरी चार्जिंग करण्यासाठी लागणारा वेळ, बॅटरीची क्षमता यामुळे अद्यापही सर्वसामान्य नागरिक इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय स्वीकारण्यास तयार नाहीत.
बॅटरी चार्जिंग करण्याची प्रक्रिया किचकट आणि गुंतागुंतीची असल्याने त्यावर जर तोडगा शोधला तर लोक मोठ्या प्रमाणावर पुन्हा या वाहनांकडे वळतील अशा अंदाजाने आता अमेरिकेमध्ये ज्या रस्त्यावरून ही वाहने धावतील ते रस्ते चार्जिंगचे काम करतील अशा प्रकारचे संशोधन सुरू आहे.
त्यासाठी इंडक्टिव्ह चार्जिंग नावाच्या एका प्रक्रियेचा वापर केला जाणार आहे. जुलै महिन्यामध्ये या संदर्भातला एक पाहिला हायवे तयार केला जाणार आहे. यावरून धावणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेईकल आपोआप चार्ज होऊ शकतात. असपायर नावाची एक कंपनी या प्रोजेक्टवर काम करत असून नॅशनल सायन्स फाउंडेशन या प्रकल्पाला आर्थिक आणि सर्व प्रकारची मदत करत आहे.
रस्त्याचे काम करत असतानाच त्यामुळे चुंबकीय कॉंक्रीटचा वापर केला तर अशा प्रकारचे चार्जिंग शक्य असल्याच्या नियमावर आधारित या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणाऱ्यांना बॅटरी चार्ज करण्यासाठी कोठेही थांबावे लागणार नाही. त्यांचा प्रवास सुरू असतानाच तो प्रवासाचा कालावधी त्यांच्या बॅटऱ्या चार्ज करण्याचे काम करेल.