स्टॉकहोम (स्वीडन) – स्वीडनच्या संसदेने प्रथमच एका महिलेला पंतप्रधान म्हणून निवडले आहे. मागदालेना अँडरसन यांना स्वीडनच्या नवीन पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले आहे. मागदालेना अँडरसन या शुक्रवारी स्वीडनचे राजे कार्ल 16 वे गुस्ताफ यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर त्या पंतप्रधनपदाची सूत्रे स्वीकारतील.
स्वीडनमध्ये 2022 साली सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अँडरसन यांना पंतप्रधान म्हणून केवळ 10 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. अँडरसन या स्वीडनमधील सोशल डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या आहेत.
स्टीफन लॉफवेन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागेवर अँडरसन यांची निवड करण्यात आली आहे. पूर्वीच्या सरकारमध्ये अँडरसन या अर्थ मंत्री होत्या. मात्र पंतप्रधान म्हणून डाव्या विचारसरणीच्या पक्षाचा त्यांना पाठिंबा नव्हता. त्यामुळे पंतप्रधानपदासाठीच्या निवडीदरम्यान त्यांची निवड केली जाण्याची शक्यता कमी होती.