पुणे – रिक्षांची दरवाढ झाल्यानंतर मीटर प्रमाणीकरण (कॅलीब्रेशन) करणे आवश्यक असते. मीटर उत्पादक किंवा दुरुस्ती केंद्रांनाच हे प्रमाणीकरण करण्याचे अधिकार असून, प्रमाणीकरणाचे दर देखील निश्चित करण्यात येतात.
सोमवारपासून (22 नोव्हेंबर) रिक्षांच्या भाडेदरात वाढ झाली. मात्र प्रमाणीकरणाच्या दरांबाबत निर्णय झाला नव्हता. यासह बैठकांमध्ये देखील एकवाक्यता न झाल्याने प्रमाणीकरणाला स्थगिती दिली आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील रिक्षांच्या भाडेदरात वाढ केली आहे. या दरानुसार भाडेमीटरमध्ये बदल करणे आवश्यक असते. यासाठी मीटर कंपन्या आणि मीटर दुरुस्ती केंद्र यांनी मीटर प्रमाणीकरणासाठी योग्य ते दर आकारणे अपेक्षित आहे. यानुसार दि. 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत मीटर उत्पादक/ दुरुस्ती केंद्र आणि रिक्षा संघटनेत एकवाक्यता झाली नाही. त्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी दुपारपर्यंत त्यांचे दर ई-मेलद्वारे कळवावेत, असे सांगितले होते.
परंतु, कोणत्याही मीटर उत्पादकाने त्यांच्या कंपनीच्या प्रमाणीकरणासाठीचे सुधारित दर कार्यालयास कळवले नाही. या अनुषंगाने मीटर रिपेअरर्सने मीटर उत्पादकांनी सॉफ्टवेअर प्रोग्रामचे दर कमी केल्याशिवाय आम्ही कमी दरात सेवा देऊ शकणार नसल्याचे कार्यालयाला लेखी निवेदन दिले आहे. त्यामुळे याबाबत कोणताही निर्णय झाला नाही.