पुणे – तीन वर्षाच्या पोटच्या मुलालाच विषारी औषध पाजून त्याचा खून करणाऱ्या नराधम आईला न्यायालयाने जन्मठेप आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा आदेश दिला. कौटुंबिक वादाच्या कारणातून त्या महिलेने मुलाला विषारी औषध पाजले. त्यानंतर आईने देखील ते औषध घेतले आणि गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला होता.
हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्या महिलेला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील ऍड. लीना पाठक यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने हा निकाल दिला.
स्वाती विक्रम माळवदकर (वय 25, रा. तळवडे) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तळवडे येथे 2 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी आकराच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याबाबत स्वाती यांचे दीर श्रीकांत माळवदकर (वय 30) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.