नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशात चीनने 60 इमारतींचा समावेश असणारे गावठाण वसवले असल्याची बातमी एनडीटीव्हीने दिली आहे. यांसदर्भातील उपग्रहाद्वारे घेण्यात आलेली छायाचित्रेही या वृत्तवाहिनीने प्रकाशित केली आहेत.
2019 मध्ये हे गावठाण अस्तित्वात नसल्याचे उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रातून स्पष्ट होत आहे. याआधी जानेवारी 2021 मध्ये चीनने अतिक्रमण करून वसवलेल्या गावाची माहिती प्रथम या वृत्तवाहिनीने दिली होती आणि नंतर अमेरिकेच्या संरक्षण खात्याने त्याची अलीकडे पुष्टी केल्याचा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे.
सीमावर्ती भागात गेल्या काही वर्षांपासून चीनीने बांधकामांचा सपाटा लावलेला असून त्यामध्ये गेली अनेक दशके चीनने बेकायदेशीरपणे व्यापलेल्या भारतीय प्रदेशातही बांधकामे करण्यात येत आहेत. भारतीय हद्दीतील चीनची ही बेकायदेशीर घुसखोरी भारताने मान्य केलेली नाही तसेच याबाबतचे चीनचे अन्यायकारक दावेही मान्य केलेले नाहीत. आता दुसऱ्यांदा चीनने जे गावठाण वसवलेले आहे त्यासंदर्भात वृत्तवाहिनीने भारतीय लष्कराशी संपर्क साधला असता असे सांगण्यात आले आहे की, आपण प्रश्नामध्ये जे ठिकाण सांगितलेले आहे ते प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ चीनच्या हद्दीत आहे.
चीनने गावठाण वसवल्याची बाब लष्कराने फेटाळून लावलेली नाही. प्रत्यक्षात असे दिसते की, हे गावठाण प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि भारताच्या दृष्टीने जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे त्यामधल्या जागेत वसवण्यात आले आहे. म्हणजेच चीनने भारताचा जो भाग बेकायदेशीरपणे व्यापलेला आहे त्यामध्ये हे गावठाण आहे. यांसदर्भात वाहिनीने लष्कराच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, आधीच्या उत्तरात कोणताही बदल नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या वृत्तवाहिनीने अरुणाचल प्रदेशातील वरीष्ठ सरकारी अधिकारी तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही याविषयीची प्रश्नावली पाठवून विचारणा केली होती. त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे.
चीनने नवे गावठाण वसवल्याची उपग्रहामार्फत घेण्यात आलेली छायाचित्रे मॅक्सर टेक्नॉलॉजीज आणि प्लॅनेट लॅब्ज या दोन संस्थानी पुरवलेली आहेत. अशी सेवा देणाऱ्या या जगातील अव्वल संस्था असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. अरुणाचल प्रदेशातील शि-योमि जिल्ह्यातील भागात वसवण्यात आलेल्या या गावठाणात डझनावारी इमारती उभारण्यात आल्या असून त्यांच्या छतावर चीनचे ध्वज रंगवण्यात आले आहेत.
या गावठाणाचे अचूक ठिकाण भारत सरकारच्या ऑनलाईन नकाशा सेवेच्या भारतमॅप्सवरही स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा एनडीटीव्हीने केला आहे. या गावठाणाचे छायाचित्र चीनच्या शिनुआ न्यूज एजन्सी या सरकारी मालकीच्या वृत्तसेवेतर्फे जुलै 2021 मध्ये प्रकाशित करण्यात आले होते.
याचवेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी व्यूहरचनात्मक दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या आणि भारतीय सीमेला लागून असलेल्या चीनी रेल्वेमार्गाची पाहणी केली होती. त्यासाठी शि-जिनपिंग यांचे विमान ज्या तळावर उतरले होते तो या गावठाण परिसरापासून फक्त 33 किलोमीटर अंतरावर आहे.