अहमदाबाद – गुजरातमधील द्वारकामध्ये पुन्हा एकदा एटीएसने ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. एटीएसने द्वारकाच्या नवाद्रा गावातील एका घरातून 24 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. जप्त केलेल्या या ड्रग्जची किंमत सुमारे 120 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी एटीएसने बुधवारी तिघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पुन्हा गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे.
अलीकडेच, गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एका गावातून, एटीएसने 120 किलो ड्रग्ज जप्त केले, ज्याची किंमत सुमारे 600 कोटी रुपये सांगितली जात आहे. याच प्रकरणाच्या तपासादरम्यान एटीएसला आज आणखी एक यश मिळाले. एटीएसच्या मते या प्ररकरणाचे धागेदोरे पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्राशी असल्याचा दावा सुद्धा यावेळी केला आहे.
कारागृहातून ड्रग्ज रॅकेट चालवल्याचा दावा
पंजाबमधील फरीदकोट तुरुंगातील भूषण शर्मा उर्फ भोला शूटर नावाचा आरोपी हा तुरुंगातूनच ड्रग्जचे रॅकेट चालवत असल्याचे अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून समजले आहे, असे एटीएसने म्हटले आहे.