मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवरील दुखण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. ठाकरे यांना बुधवारी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल केले होते. मात्र माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यावर देखील टीका केली होती. मात्र आता त्यांनी आपल्या विधानावरून घुमजाव केलं आहे.
सोमय्या म्हणाले होते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करोना काळात काम नव्हे तर खाली मान घालून पैसे मोजत होते. स्वतःच्या बायकोचे 19 बेकायदेशीर बंगले वाचवण्यात व्यस्त होते. अशी टीका किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. ते बुलढाणा दौऱ्यावर होते.
दरम्यान त्यांनी केलेल्या टीकेनंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर चहुबाजुने टीका करण्यात आली. हाच मुद्दा धरून सोमय्या यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सोमय्या यांनी पलटी मारत, मी असं बोललोच नाही, असं म्हटलं. वास्तविक पाहता त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ देखील उपलब्ध आहे.
यावेळी सोमय्या यांनी पत्रकारांशी वाद घातला. तसेच आपण मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रियेवर काहीच बोललो नाही, अस त्यांनी म्हटलं.