लंडन – 2019 पासून लंडनच्या उच्च सुरक्षा बेलमार्श तुरुंगात असलेले विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांना तुरुंगात लग्न करण्याची परवानगी देण्यात आली आहे. द गार्डियनमधील वृत्तानुसार, असांजे त्यांची जोडीदार स्टेला मॉरिस यांच्याशी विवाह करणार आहेत.
ज्युलियन असांजे हे ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत. 2019 मध्ये त्यांना यूके पोलिसांनी अटक केली होती. असांजे यांच्यावर अमेरिकेत गुप्त कागदपत्रे लीक केल्याबद्दल हेरगिरीचे आरोप आहेत. त्यांनी अफगाणिस्तान आणि इराक युद्धांशी संबंधित अनेक लष्करी आणि संरक्षण दस्तऐवज प्रकाशित केले होते. तेंव्हापासून त्यांना लंडनच्या उच्च सुरक्षा बेलमार्श तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तसेच यापूर्वी त्यांच्यावर लैगिक छळाचेही आरोप होते.
असांजे यांची जोडीदार स्टेला मॉरिस या व्यवसायाने वकील असून त्यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला आहे. 2011 मध्ये दोघांची भेट झाली होती. मॉरिस आणि असांजे यांचे नाते 2015 मध्ये सुरू झाले आणि दोन वर्षांनंतर दोघांनी एगेजमेन्ट केली.
– ब्रिटीश कायद्यात कैद्यांना तुरुंगात लग्न करण्यास परवानगी
1983 विवाह कायद्याअंतर्गत यूके कायदा कैद्यांना तुरुंगात लग्नासाठी अर्ज करण्याची परवानगी देतो. अर्जदारांना लग्नाचा खर्च उचलावा लागतो. तसेच तुरुंगातच लग्न करावे लागते. त्यांनी अर्ज केल्यानंतर तरुंगात लग्न करण्याची परवानगी देण्यात आली आहे. लवकरच ते लग्न करणार आहेत.