#T20WorldCup #PAKvAUS 2nd Semi Final | वेडच्या वादळात पाकिस्तान भूईसपाट

ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत, उपांत्य लढतीत 5 गडी राखून विजयी

दुबई –आयसीसी टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील लढतीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानच्या हातातून सामना खेचून आणला. मॅथ्यु वेडच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत त्यांची लढत येत्या रविवारी न्यूझीलंडशी होणार आहे.

पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरन फिंच साफ अपयशी ठरला. त्यानंतर मिशेल मार्श व डेव्हीड वॉर्नर यांनी संघाचा डाव सावरताना संघाला अर्धशतकी मजल मारून दिली. मार्श 22 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार यांच्या मदतीने 28 धावा करून बाद झाला. त्यानंतर स्टिव्हन स्मिथ व ग्लेन मॅक्‍सवेल बाद झाले.

त्याचवेळी अष्टपैलू मार्कस स्टोनिस व मॅथ्यु वेड ही जोडी जमली व त्यांनी सावध खेळी करत संघाचे शतक फलकावर लावले. या जोडीने त्यांच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत धावांचा वेग वाढवला. 5 बाद 96 अशा बिकट स्थितीतून या जोडीने संघाला विजयाच्या मार्गावर आणले. स्टोनिसच्या साथीत वेडने वादळी फलंदाजी केली. त्याने केवळ 17 चेंडूत नाबाद 41 धावांची खेळी केली.

या खेळीत त्याने 2 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. स्टोनिसने नाबाद 40 धावांची खेळी करताना 31 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार फटकावले. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 81 धावांची अखंडित भागीदारी केली व संघाचा विजय 19 व्या षटकातच साकार केला. पाकिस्तानकडून शादाब खानने 4 गडी बाद केले.

त्यापूर्वी, पाकिस्तानने आपल्या डावात 4 बाद 176 असा धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर महंमद रिझवान व फखर झमान यांनी दमदार अर्धशतके फटकावली तर कर्णधार बाबर आझमने उपयुक्त खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरन फिंचने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय साफ चुकीचा ठरवताना पाकिस्तानच्या पहिल्या तीन फलंदाजांनीच त्यांच्या सगळ्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले.

सलामीवीर कर्णधार आझमने रिझवानच्या साथीत संघाला 71 धावांची सलामी दिली. आझमने 39 धावांची खेळी करताना 34 चेंडूत पाच चौकार फटकावले. त्यानंतर झमानने दमदार अर्धशतकी खेळी केली व रिझवानच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 72 धावांची भागीदारी केली. अर्धशतकी खेळी करणारा रिझवान 67 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 52 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 4 षटकार फटकावले.

दरम्यान, झमानने अखेरच्या षटकांत घणाघाती फलंदाजी केली. त्याने नाबाद 55 धावा करताना 32 चेंडूत 3 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. पाकिस्तानच्या धावसंख्येला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी 13 अवांतर धावा देत हातभार लावला. पाकिस्तानने 20 षटकांत 4 बाद 176 धावा उभारल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने 2 गडी बाद केले. ऍडम झम्पा व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक –

पाकिस्तान – 20 षटकांत 4 बाद 176 धावा. (महंमद रिझवान 67, बाबर आझम 39, फखर झमान नाबाद 55, महंमद हाफीद नाबाद 1, मिशेल स्टार्क 2-38, ऍडम झम्पा 1-22, पॅट कमिन्स 1-30).
ऑस्ट्रेलिया – 19 षटकांत 5 बाद 177 धावा. (डेव्हिड वॉर्नर 49, मिशेल मार्श 28, मॅथ्यू वेड नाबाद 41, मार्कस स्टोनिस नाबाद 40, शादाब खान 4-26, शाहीन आफ्रिदी 1-35).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.