इस्लामाबाद – पाकिस्तानात एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मिरातल्या कोटली जिल्ह्यातील डोंगराळ भागात हा अपघात झाला.
अत्यंत नागमोडी वळणावर बस नादुरुस्त झाली. बस पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात चालकाचा अंदाज चुकल्याने ही बस 500 फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये एकूण 25 प्रवासी होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे.
बस दरीत कोसळल्यानंतर फेरीवाल्या विक्रेत्याने या अपघाताबाबत जवळच्या गावातील धर्मगुरूला याबाबत कळवले. या धर्मगुरूने लाउडस्पीकरवरून नागरिकांना मदतीचे आवाहन केले. त्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरू झाले.
या अपघातानंतर ही बस पूर्णपणे नष्ट झाली. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना दरीतून बाहेर काढून रुग्णालयात पाठवले जात आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातात बचावलेल्या सर्वांचीच प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जवळपासच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झालेली बस कोटली जिल्ह्यातील एका गावातून रावळपिंडीला जात होती.
पाकव्याप्त काश्मीरमधील डोंगराळ भागातील खराब रस्ते आणि निष्काळजी वाहन चालकांमुळे या भागात वारंवार अपघात होत असतात.