चिंबळी/पुणे -ग्रामीण भागासह शहर परिसरात थंडीचे प्रमाण काहीसे वाढले असून, पहाटे तसेच रात्री नागरिकांना थंडीची अनुभूती होत आहे. त्याचबरोबर तापमानात चढ उतार होत असले, तरी गार वाऱ्यांमुळे दिवसादेखील ऑक्टोबर हिटचा तडाखा कमी झाल्याचे पाहयाला मिळत आहे.
जिल्ह्यात परिसरात पहाटे पडणारे दाट धुके आणि रात्री जाणवणारी थंडी यामुळे अद्याप हिवाळा सुरू झाला नसला, तरी त्याची चाहूल लागत आहे. किमान तापमानाचा पारा या आठवड्यात तब्बल 15 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला असून,
रात्रीच्या वेळी तापमानात काही अंशी घट होत असल्याने, थंडी जाणवत आहे. शहरात बुधवारी (दि.27) सकाळी 8. 30 पर्यंत किमान तापमान 15.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
जिल्ह्यात परिसरात पुढील आठवडाभर शहरातील हवामान मुख्यत्वे कोरडे राहणार असून, या दरम्यान किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. खेड तालुक्याच्या दक्षिण भागात गेल्या
तीन ते चार दिवसांपासून पहाटे धुक्याची चादर पसरत आहे. पहाटे पाच वाजेपासून धुके दाटले. ते सकाळी आठ वाजेपर्यंत कायम असते. त्यामुळे सकाळी वाहनांना दिवे लावण्याची वेळ आली आहे.
या धुक्यातून चालण्याचा आनंद सकाळी अनेकांनी आवर्जून घेतला. दरम्यान, सात वजता सूर्य नारायणाने दर्शन दिल्यावर धुक्याची ही चादर विरून गेली. त्यामुळे हे धुके म्हणजे गुलाबी थंडीची चाहूलच असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.