पुणे – लोणी काळभोर येथे खून केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या आदित्य धाराशिवकर याला सत्र न्यायाधीश बी.पी.क्षीरसागर यांनी 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे घटना घडल्यापासून एक महिन्याच्या आत जामीन मिळाला आहे.
हा गुन्हा आकस्मित भांडणातून घडलेला असून, आरोपीस मयत यास मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता. तसेच, त्यांचे पूर्ववैमनस्य नव्हते. या गुन्ह्यात कोणतेही घातक हत्यार वापरलेले नसल्याने सदरचा प्रकार हा खुनाच्या परिभाषेत मोडत नाही, असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे ऍड. अभिजित सोलनकर यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा आदेश दिला.
या गुन्ह्यातील आरोपी आदित्य धाराशिवकर हा चालवित असलेल्या चार चाकी वाहनाचा कट लागल्याचे कारणावरून सुंदर पवार व त्याचे इतर साथीदारांचे भांडण झाले.
यातून झालेल्या चकमकीत सुंदर शिवा पवार याचे छातीत लाथा मारल्याने तो जमिनीवर बेशुद्ध होऊन पडला. त्यास दवाखान्यात मयत घोषित करण्यात आले होते. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी भादवि कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी बचाव पक्षातर्फे ऍड. अभिजित सोलनकर, ऍड. हितेश सोनार, विष्णू होगे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.