चेअरमन डॉ. सुरेश भोसले : 62 व्या गळीत हंगामास प्रारंभ
कराड – कृष्णा कारखाना हा महाराष्ट्रातील सर्वांत जुना कारखाना आहे. सहकार क्षेत्राला दिशा देण्याची क्षमता कृष्णा कारखान्यामध्ये असून, महाराष्ट्रात हा कारखाना पथदर्शी ठरावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कृष्णा कारखान्याच्या 62 व्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते आणि कृष्णा सहकारी बॅंकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाणीत मोळी टाकून 62 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाला व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव पाटील, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, दत्तात्रय देसाई, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, साखरेचा दर स्थिर नसल्याने साखर उद्योग अडचणीत आहे. जगात ब्राझील हा देश सर्वांत मोठा साखर उत्पादक देश असून, यंदा तिथे दुष्काळ पडल्याने साखरेचे उत्पादन प्रचंड घटले आहे. अशावेळी भारतातील साखरेला जागतिक बाजारपेठेत मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असली, तरी दराबद्दल साशंकता कायम आहे. आत्तापर्यंत कुठल्याही सरकारने इथेनॉलचे दर निश्चित केले नाहीत.
मात्र ना. नितीन गडकरी यांनी इथेनॉलचे दर निश्चित करून साखर उद्योगाला स्थिरता मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच यंदाच्या हंगामात इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देण्याचे धोरण आमच्या संचालक मंडळाने घेतले आहे. बी हेव्ही तसेच रसापासून इथेनॉल निर्मिती करण्याबरोबरच साखरेपासून इथेनॉल निर्मिती करणे कितपत शक्य आहे, याबाबतचा प्रयोगही केला जाणार आहे.
कृष्णा बॅंकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले म्हणाले, की सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पासाहेबांच्या काळात जशी कृष्णा कारखान्याची वाटचाल सुरू होती, तशीच प्रगतीशील वाटचाल डॉ. सुरेशबाबा व त्यांच्या संचालक मंडळाची सुरू आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही दिलेल्या मोफत साखर घरपोच आश्वासनाची वचनपूर्ती सुरू आहे. येत्या 5 वर्षातही संचालक मंडळाने आर्थिक शिस्त पाळण्याचा संकल्प सोडला असून, या संचालक मंडळानेही कारखाना हितासाठी भत्ता नाकारला आहे. संचालक लिंबाजी पाटील यांनी आभार मानले.
तोडणी वाहनांना जीपीएस प्रणाली बसविणार
तोडणी वाहतुकीत होणारी फसवणूक टळावी, यासाठी सुरवातीला दोन गटांमध्ये सर्व तोडणी वाहनांना जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार आहे. यामध्ये जेवढे अंतर तेवढे पैसे दिले जाणार असून, टप्प्याटप्पाने सर्वच तोडणी वाहनांना जीपीएस प्रणाली बसविणार असल्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.