दोन्ही गटांची तयारी पूर्ण; कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष
सूर्यकांत पाटणकर
पाटण – जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. नाबार्डचे अनेक पुरस्कार प्राप्त बॅंकेचा नावलौकिक संपूर्ण राज्यभर आहे. त्यामुळे बॅंकेवर आपलेच वर्चस्व असावे यासाठी देसाई-पाटणकर यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सोसायटी मतदार संघातून युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर व मंत्री शंभूराज देसाई हे दोन्ही नेते इच्छुक असल्याने दोघांपैकी कोणाला संधी मिळणार? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अर्ज भरण्यासाठी 25 ऑक्टोंबर पर्यंत मुदत आहे तर 21 नोव्हेंबरला जिल्हा बॅंकेसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर इच्छुक असून त्यांची इंट्री या निवडणुकीच्या निमित्ताने बॅंकेत होणार आहे. तर मंत्री शंभूराज देसाई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक पदासाठी इच्छुक असून त्यांनीही सोसायटी मतदार संघातून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
जिल्हा बॅंकेसाठी दोन्ही नेते इच्छुक असले तरी निर्णय मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अवलंबून आहे. बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात त्यांनी बुधवारी बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये मतदार संघ निहाय आढावा घेऊन काही संचालकांची नावे फायनल केली आहेत. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटण तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हा बॅंकेवर अनेक वेळा केले आहे.
राष्ट्रवादीकडून यावेळी युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर इच्छुक आहेत. त्यांना जिल्हा बॅंकेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा तालुक्यातील कार्यकर्त्यांची आहे. मंत्री शंभूराज देसाई जिल्हा बॅंकेतील प्रवेशासाठी इच्छुक आहेत. तशी त्यांच्या ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र सध्या ते महाविकासआघाडी मधील राज्यमंत्री असल्याने सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आहे.
पाटण तालुक्यात जिल्हा बॅंकेसाठी सोसायटी मतदार संघाचे 103 मतदान आहे. त्यामुळे स्थानिक सेवा सोसायटी यांचे ठराव आपल्याच बाजूने करण्यासाठी मोठ्याप्रमाणात रस्सीखेच दोन्ही नेत्यांमध्ये होती.एकाच संस्थेचे दोन वेळा वेगवेगळे ठराव देण्याचे प्रकार ही घडले आहेत. दोन्ही ठराव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवले आहेत. त्यामुळे यावेळी दोन ते तीन सोसायट्यांचे ठराव बाद झाले आहेत.
सोसायटी मतदार संघातून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी अनेक वेळा जिल्हा बॅंकेवर वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे या मतदारसंघावर सध्या राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. मात्र तरीही मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा बॅंक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त ठराव आपल्या बाजूने करण्याचे आदेश दिले होते.
पाटणमध्ये आघाडीचा तोटा…
राज्यात भाजपला सत्तेपासून अलिप्त ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाविकास आघाडीमुळे पाटण तालुक्यात राष्ट्रवादीचा सर्वाधिक तोटा झाला आहे. सत्तेत असूनही कार्यकर्त्यांना नेहमी विरोधी पक्षात असल्याचा भास होत आहे. विकासकामांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. परिणामी पक्षाच्या विस्तारावर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्हा बॅंकेत पुन्हा राष्ट्रवादीलाच संधी द्यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची आहे.