पुणे – मद्यपान करताना शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्राचा खून करणाया सराईताला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. साहिल भरत इजगद (रा . सिंहगड रोड) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. मंदार सुनिल जोगदंड (वय २३ रा. आंबिल ओढा) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे.
दत्तवाडी परिसरात मित्राचा खून करणारा सराईत आरोपी मित्रांना भेटण्यासाठी नीलायम पुलाखाली येणार आहे. त्यानंतर तो सोलापूरला पळून जाणार असल्याची माहिती पोलीस हवालदार कुंदन शिंदे, शिवाजी क्षीरसागर आणि दयानंद तेलंगे पाटील यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून साहिल इजगद याच्यासह दोन अल्पवयींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी मंदारने शिवीगाळ केल्यामुळे खून केल्याची कबुली दिली. त्याशिवाय मुख्य अल्पवयीन सुत्रधाराला पोलिसांनी दत्तवाडी भागातील ओढा परिसरातून ताब्यात घेतले.
ही कामगिरी अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, वरीष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरिक्षक विजय खोमणे उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, कुंदन शिंदे, राजु जाधव, विष्णु सुतार पुरुषोत्तम गुन्ला, राहुल ओलेकर , अक्षयकुमार वाबळे , शिवाजी क्षिरसागर शरद राऊत, दयानंद तेलंगेपाटील , प्रमोद भोसले , अमित सुर्वे , भारत आस्मर यांनी केली.