पुणे (प्रभात वृत्तसेवा) – कुरीअर कंपनीत दरोडा टाकून 37 लाख रुपये लुटल्याप्रकरणात सहभागी असलेल्या कंपनीतीलच कर्मचाऱ्याचा जामीन मोक्का न्यायालयाने फेटाळला. विशेष मोक्का न्यायाधीश जी.पी. आगरवाल यांनी हा आदेश दिला.
विठ्ठल अनिल जाधव (वय 22, रा. जोगवाडी, ता. बारामती) असे त्याचे नाव आहे. तो कुरीअर कंपनीत कामाला होता. त्याचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असून, त्यानेच कंपनीत 37 लाख रुपये येणार असल्याची माहिती आरोपींना फोनवरून दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपींना कार्यालयात सहजासहजी जाता यावे, यासाठी कार्यालयाचा दरवाजा उघडा ठेवला होता. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या इतर कामगारांना मारहाण करण्यात आली. त्यांचे हातपाय बांधण्यात आले. मात्र, जाधव याला बांधण्यात आले नाही अथवा मारहाण करण्यात आली नाही. त्यामुळे त्याचा गुन्ह्यातील सहभाग सिध्द होतो. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्याचा युक्तीवाद मोक्काचे विशेष सरकारी वकील ऍड. प्रमोद बोंबटकर यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने वरील आदेश दिला.
शुक्रवार पेठ येथील कंपनीच्या कार्यालयात 2 फेब्रुवारी 2016 रोजी ही घटना घडली. कुरीअर कंपनीचा दरवाजा उघडा ठेवून कामगार झोपले होते. त्यावेळी कामगारांना मारहाण करून रोकड लांबविण्यात आली.
यामध्ये टोळीप्रमुख अंबादास ऊर्फ दादा तायप्पा पवार (वय 25, रा. चिखली, ता इंदापूर) , जाधवसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी जाधव याने जामिनासाठी अर्ज केला. यास मोक्काचे विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला.