मुंबई – कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीच्या दोन्ही पर्वांना अभूतपूर्व यश मिळाले असून, यंदाचा तिसरा सिझन ‘बिग बॉस ३’ देखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. दिवसेंदिवस हा कार्यक्रमात प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.
नुकतीच बिग बॉसच्या घरात एका नवीन स्पर्धकाची इन्ट्री झाली आहे. “आदिश वैद्य’ हा चेहरा वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे घरामध्ये दाखल झाला. बिग बॉसच्या घरामध्ये आदिश वैद्य आल्यापासून त्याचे काही सदस्यांशी खटके उडत आहेत.
पहिल्याच दिवशी त्याची जयसोबत बाचाबाची झाली मग स्नेहाच्या रागाचा त्याला सामना करावा लागला आणि नुकतंच एका टास्क दरम्यान सुरेखा ताईंचे आदिश सोबत कडक्याचे भांडण झाले. आदीशच्या अचानक घरामध्ये झालेल्या एंट्रीमुळे घरातील संपूर्ण वातावरणच बदलून गेले आहे.
शिवाय सोशल मीडियावर त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. अभिनेता आदिश वैद्यने कुंकू टिकली आणि टॅटू , जिंदगी नॉट आउट, बॅरिस्टर बाबू, गुम है किसीं के प्यार में, या मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, रात्रीस खेळ चाले या मालिकेतून त्याला खरी लोकप्रियता मिळाली.
आदिश त्याच्या लव्ह-लाईफमुळेदेखील सोशल मीडियावर चर्चेत आहे. आदिशची गर्लफ्रेंड रेवती ही देखील अभिनेत्री असून ती एक उत्तम कथ्थाक नृत्यांगनासुद्धा आहे. आदिश आणि रेवती यांचे काही फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.