फूलशेतीचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
कराड – लॉकडाऊनमध्ये युवा शेतकरी शेतीकडे झुकला आहे. त्यामुळे फुलशेतीचे प्रमाण वाढल्यामुळे दसऱ्याकडे डोळे लावून थांबलेला झेंडू उत्पादक अडचणीत आला आहे. झेंडूला घाऊक बाजारात किलोला 10 ते 30 रूपये दर मिळत आहे. नवरात्रीच्या मुहुर्तावर झेंडूच्या फुलाची 20 ते 40 रूपये प्रती किलो दराने किरकोळ विक्री होत आहे. नवनवीन प्रयोग करत फुलशेती वाढल्यामुळे अष्टर, शेवंती, गुलछडी, व गुलाबाचे दर ही उतरले आहेत.
नेहमीच्या पिकांना योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी भाजीपाला व फुलशेतीसह इतर पिकाकडे वळले आहेत. गेल्या वर्षी झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्ठीमुळे झेंडूच्या बागा जोपासणे अवघड झाले होते. झेंडूच्या रोपांची लागण केल्यापासुन माल बाजारात पोहोच करण्यापर्यंतच्या उत्पादन खर्चाचा विचार करता फुलांना दरवर्षी जेमतेम 20 ते 80 रूपये प्रती किलो दर मिळत होता.
दसरा दिवाळीला तर ग्राहक मिळवतानाही ओरडून घसा कोरडा करावा लागत असे. मात्र गेल्यावर्षी अतिवृष्ठीतही कसरत करून बागा जगवलेल्या शेतकऱ्यांच्या फुलांना दसऱ्याला घाऊक बाजारात किलोला 100 ते 120 रूपये दर मिळाला तर किरकोळ विक्री 300 वर गेली होती. दिवाळीत ही झेंडूचे जागेवरच दर 130 ते 140 रूपये प्रती किलो असा होता. तर 200 ते 400 रूपयाने किरकोळ विक्री सुरू होती.
त्यामुळे झेंडू उत्पादकांना तेव्हा समाधानकारक दर मिळाले होते. मात्र यावर्षी शेतकऱ्यांचा फुलशेतीकडे कल अधिकच वाढला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या बागा वाढल्या आहेत. परिणामी गणपतीपासूनच फुलांचे दर गडगडले आहेत.
दसऱ्याला दर मिळेल या उद्देशाने शेतकऱ्यांनी रानातच फुलांचा माल ठेवल्यामुळे धुक्याने अनेक शेतकऱ्यांच्या बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्या आहे. आता कमी दर व फुलांवरील करपा रोग या दुहेरी संकटात शेतकरी सापडल्याने शेतात घातलेला खर्च ही निघणे मुश्कील होउन बसले आहे.
पावसाने नुकसान झाल्यामुळे फुलाचे दर वाढण्याचा आंदाज होता. मात्र यंदा फुलांच्या बागा जास्त असल्याने फुलाचे दर सध्या उतरले आहेत. दसऱ्याला घाऊक व्यापाऱ्यांनी कर्नाटकातील फुले मागवल्यास येथील शेतकरी आणखीनच अडचणीत येणार आहे.
सुरेश देशमुख, फुले व्यापारी
शेतीतील तोटा भरून काढण्यासाठी झेंडूच्या फुलांची बाग केली. मात्र यावेळी पावसाने व करपा रोगाने अनेक शेतकऱ्यांच्या फुलशेतीचे नुकसान झाले. साध्या फुलांचे दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
नवनाथ मोरे, झेंडू उत्पादक शेतकरी