नवी दिल्ली – अजूनपर्यंत करोनालस न घेणाऱ्या दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना आता धावाधाव करावी लागणार आहे. त्यांच्यासाठी लसीचा किमान एक डोस अनिवार्य करण्यात आला आहे. अन्यथा, त्यांना 16 ऑक्टोबरपासून पहिला डोस घेईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवले जाणार आहे.
संबंधित निर्णयाचा आदेश दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शुक्रवारी जारी केला. निर्धारित मुदतीत लसीचा पहिला डोस न घेणाऱ्या सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना सेवेत रूजू होण्यास मनाई केली जाईल. दिल्ली सरकारने लसीकरण वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला आहे. त्यातून सर्व सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या संपर्कात अनेक जण येतात. त्यामुळे करोना फैलाव रोखण्यासाठी संबंधित आदेश जारी करण्यात आला आहे. दिल्लीत केंद्र सरकारचे कर्मचारीही कार्यरत आहेत. त्यांच्यासाठीही त्या सरकारने असाच आदेश काढावा, अशी अपेक्षाही दिल्ली सरकारने व्यक्त केली आहे.