शारजा – नवोदित व्यंकटेश अय्यरच्या आक्रमक फलंदाजीनंतरही घसरलेला कोलकाता नाईट रायडर्सचा डाव शुभमन गिलने अफलातून अर्धशतकी खेळी करत सावरला. मात्र, त्याला अन्य फलंदाजांची साथ न मिळाल्याने त्यांना 20 षटकांत 4 गडी गमावून 171 धावांवपर्यंत मजल मारता आली.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकत कोलकाताला प्रथम फलंदाजी दिली. दव नसलेल्या खेळपट्टीवर कोलकाताने थाटात सुरुवात केली. गिल व अय्यर यांनी राजस्थानच्या गोलंदाजांवर दडपण आणले. या जोडीने 79 धावांची दमदार सलामी दिली. यावेळी गिलपेक्षा अय्यर जास्त आक्रमक फलंदाजी करत होता. त्याने 35 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 38 धावांची खेळी केली. त्यानंतर विनाकारण यष्टी सोडून खेळण्याच्या प्रयत्नात राहुल तेवतियाच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला.
त्यानंतर गिलने डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली. त्याने नीतिश राणा, राहुल त्रिपाठी यांच्यासह महत्वापूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरताना संघाला शतकी धावसंख्या गाठून दिली. गिलने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. मात्र, त्यानंतर धावांचा वेग वाढवताना तो 56 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 44 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 2 षटकार फटकावले. गिल परतल्यावर दीनेश कार्तिक व कर्णधार इयान मॉर्गन यांनी आक्रमक फटकेबादी करत संघाला दीडशतकी धावांच्या पुढे मजल मारुन दिली. राजस्थानकडून ग्लेन फिलिप्स, चेतन सकारीया व ख्रिस मॉरीस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
हा सामना कोलकातासह मुंबई इंडियन्सच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईसाठी राजस्थानने हा सामना जिंकणे महत्वाचे आहे. कोलकाता 13 सामन्यांत 6 विजयांसह 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर राजस्थान रॉयल्स 13 सामन्यांत 5 विजय आणि 10 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. जर कोलकाताने हा सामना जिंकला तर 14 गुणांसह, त्यांना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी जास्त आहे. जर त्यांना या सामन्यात पराभव पत्करावा लागला तर त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
या दोन संघात आयपीएलच्या इतिहासात एकूण 21 सामने खेळले गेले आहेत. त्यात कोलकाताने 12 तर, राजस्थानने 11 वेळा विजय मिळवला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही. गेल्या मोसमात झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये कोलकाताने राजस्थानचा पराभव केला होता. मात्र, यंदाच्या मोसमात पहिल्या लढतीत राजस्थानने कोलकाताला पराभूत केले आहे.
संक्षिप्त धावफलक –
कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 4 बाद 171 धावा. (शुभमन गिल 56, व्यंकटेश अय्यर 38, राहुल त्रिपाठी 21, नीतिश राणा 12, दीनेश कार्तिक नाबाद 14, इयान मॉर्गन नाबाद 13, ग्लेन फिलिप्स 1-17, चेतन सकारीया 1-23, ख्रिस मॉरीस 1-28).