नवी दिल्ली – कच्च्या मालाचे दर वाढत असल्यामुळे कार कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा सुरू केला आहे. त्यामध्ये टोयोटो किर्लोस्कर मोटार कंपनी सामील झाली आहे. आज या कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या कंपनीद्वारे विकल्या जाणाऱ्या सर्व मॉडेलच्या दरात दोन टक्के वाढ करण्यात येणार आहे.
हा निर्णय एक ऑक्टोबर पासून अंमलात येणार आहे. पोलदासह कारला लागणाऱ्या इतर कच्च्या मालाच्या दरामध्ये एकतर्फी वाढ होत आहे. त्याचबरोबर सेमीकंडक्टरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कार कंपन्यांनी दरवाढ सुरू केली आहे.
गेल्याच आठवड्यात टाटा मोटर्स कंपनीने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या दरात दोन टक्क्यांची वाढ केली होती. मारुती सुझुकी कंपनीने आपल्या काही मॉडेलच्या दरांमध्ये दोन टक्क्यापर्यंत वाढ केलेली आहे. मारुती सुझुकी आणि हीरो मोटोकॉर्प या दोन कंपन्यानी या वर्षी तीन वेळा दरवाढ केले असल्याचे दिसून येते.