नवी दिल्ली – ऍमेझॉन कंपनीचा उल्लेख संघाच्या मुखपत्रात दुसरी ईस्ट इंडिया कंपनी असा करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने बोलताना कॉंग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटले आहे की, ऍमेझॉन बाबत संघाने जे काही म्हटले आहे ते संदर्भहीन आहे.
संघाच्या मुखपत्रात देशहिताचे नव्हे तर भाजप हिताचेच लिहीले जाते असे त्यांनी म्हटले आहे.तथापी संघाने ऍमेझॉन कंपनी बाबत केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत ते सहज दुर्लक्षित करता येणार नाहीत असेही खेरा यांनी नमूद केले आहे.
या कंपनीने भारतातील आपल्या कामांसाठी आणि सरकारी धोरणे आपल्याला अनुकुल व्हावीत यासाठी कोट्यावधी रूपयांची लाच दिली आहे असे संघाच्या पांचजन्य या मुखपत्रात नमूद करण्यात आले आहे. तो आरोप गंभीर असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
पांचजन्यचा हा अंक 3 ऑक्टोबरला प्रकाशित होणार असून त्यात ऍमेझॉन कंपनीवर टीका करणारी कव्हर स्टोरी प्रकाशित करण्यात आल्याच्या वृत्ताच्या अनुषंगाने खेरा यांनी हा आरोप केला आहे.