मुंबई -राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, मुंबईतील शाळा सुरू करण्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे मुंबईतील शाळा सुरू कधी होणार याचे गूढ वाढले आहे. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारण्यात आले असता येत्या दोन दिवसात आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. करोनाच्या परिस्थितीवर आमचं लक्ष आहे. दोन दिवसात आम्ही याबाबतचा आढावा घेऊन त्याबाबतचा पुढील निर्णय घेऊ. हा आढावा घेताना गणपती नंतर झालेल्या चाचण्यानंतर काय रिझल्ट आला तेही पाहिलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
मुंबईत शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. शिक्षकांचं 70 टक्के लसीकरणही झालं आहे. पालिकेच्या 10 हजार शिक्षकांपैकी 7 हजार शिक्षकांच लसीकरण झालं आहे. या सर्वांचा आढावा घेण्यात येणार आहे, असंही त्या म्हणाल्या.
मुंबईत करोना रेट कमी झाला आहे. सध्या पॉझिटीव्हिटी रेट 0.06 टक्के आहे. 100 पैकी एक ते दोन जणांचे कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. तसेच, 15% रुग्ण बेडवरच आहेत. तसेच 85% बेड रिक्त आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.