पर्यटन क्षेत्र आशावादी; लसीकरण वाढल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – बऱ्याच राज्यांमध्ये लसीकरण वेगाने झाले आहे. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारने बरेच निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे आगामी काळात पर्यटकांची संख्या वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे पर्यटन उद्योगांच्या संघटनेने म्हटले आहे.

कॉन्फडरेशन ऑफ हॉस्पिटॅलीटी इंडस्ट्री संघटनेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, करोना व्हायरसमुळे इतर उद्योगांवर फारसा परिणाम झाला नसताना पर्यटन उद्योगाचे कंबरडे मोडले होते. मात्र आता नागरिक पर्यटन करण्याबाबत विचार करू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटन अजून पूर्वपदावर आले नसताना देशांतर्गत पर्यटन मात्र वाढू लागण्याची चिन्हे आहेत. पर्यटक लगतच्या शहरांना भेटी देऊ लागले आहेत.

आगामी काळात पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. मेक माय ट्रिप या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मॅगो यांनी सांगितले की, आता पर्यटक पर्यावरण संतुलनाबाबत संवेदनाशील झाले आहेत. या अगोदर पर्यटक पर्यावरणाबाबत फारसे जागरूक नव्हते. मात्र करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पर्यावरण संतुलनाचे महत्त्व पर्यटकांना कळू लागले आहे.

आतापर्यंत बऱ्याच पर्यटकांना पर्यटन करण्याची इच्छा असूनही निर्बंधामुळे पर्यटन करता आले नव्हते. त्यामुळे उत्सवाच्या काळात आणि त्यानंतर पर्यटकांची संख्या वाढविण्याबाबत आम्ही आशावादी आहोत, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.