- 14 कोटी 42 लाखांची थकबाकी :
- नागरिकांमध्ये रोष
पिंपरी – थकबाकीपोटी पिंपरी चिंचवड शहरातील 13 हजार 308 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे गेली अनेक दिवसांपासून हे ग्राहक अंधारातच आहेत. वीजपुरवठा खंडित केल्यामुळे अनेक नागरिकांचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास, वर्क फ्रॉम होम सर्वकाही ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे.
महावितरणने वीजबिलांच्या वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान करोनाच्या प्रादुर्भावामुळशहराबाहेर गेलेल्या व तेथूनच “वर्क फ्रॉम होम‘द्वारे नोकरी करणाऱ्या ग्राहकांमुळे, भाडेकरू नसल्याने बंद घर किंवा इतर कारणांमुळे वीजवापर नसल्याने अनेक घरगुती ग्राहकांनी थकबाकी भरली नसल्याचे महावितरणच्या पडताळणीमध्ये दिसून येत आहे.
वीजपुरवठा खंडित केल्यानंतर घरात कोणी राहत नाही किंवा अन्य कोणत्याही कारणांमुळे वीज वापर नसला तरी बिलांची थकबाकी ठेऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. ग्राहकांनी कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाइनद्वारे थकबाकी व पुनर्जोडणी शुल्क भरल्यास वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. मात्र कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर सहा महिन्यांमध्ये व्याज, दंड आणि संपूर्ण थकबाकी न भरल्यास नंतर नवीन वीजजोडणी घ्यावी लागणार आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी प्रामुख्याने घरगुती ग्राहकांनी वीजवापर नसल्यास किंवा घर बंद असले सध्याची थकबाकी व पुनर्जोडणी शुल्काचा भरणा करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणकडून सध्या शून्य ते 30 युनिट वीजवापर होणाऱ्या वीजजोडण्यांची तपासणी वेगाने सुरु आहे. तसेच वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या वीजजोडण्यांच्या पर्यवेक्षणासाठी स्वतंत्र पथकांद्वारे दिवसा व सायंकाळनंतर विशेष तपासणी सुरु आहे. या दोन्ही मोहिमेत थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही आजूबाजूच्या ठिकाणाहून केबलद्वारे अनधिकृत वीजवापर आढळल्यास केल्यास नियमाप्रमाणे कलम 126, 135 किंवा 138 नुसार कारवाई करण्यात येत आहे.