नगर -राहुरी येथील एका हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून वेटरचा खून करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपीचे पूर्ण नाव ही माहित नव्हते. केवळ नामदेव मामा अशा अपूर्ण नावावरून आरोपी नामदेव केशव दराडे (वय 30, रा. गोळेगाव, शेवगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगरमधील पुणे बसस्थानक येथून ताब्यात घेतले.
दोन दिवसांपूर्वी नगर-मनमाड रोडवरील राहुरी शिवारातील हॉटेल साक्षी येथे वेटर सोनू नारायण छत्री (वय 27, रा. जोडवाडी, गेवराई, बीड) याच्या डोक्यात लोखंडी पहार घालून त्याचा खून झाला होता. या प्रकरणी हॉटेलचे मालक प्रमोद बापूसाहेब म्हसे यांच्या फिर्यादीवरून नामदेव मामा अशा नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके व गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून आरोपीचा शोध सुरू केला.
पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीचा प्राप्त फोटोचे आधारे बातमीदारामार्फत पूर्ण नाव व माहिती मिळविली. त्यानुसार पथकाने आरोपीचे मूळ गाव, शेवगाव, पाथर्डी, नगर शहरातील सर्व बसस्थानके, रेल्वे स्टेशन येथे आरोपीचा शोध घेत होता. पुणे बसस्थानक येथून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.