नगर -नगर शहरात मंगळवारी जोरदार पाऊस कोसळला. दुपारी आणि सायंकाळी सरी कोसळल्या. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. रात्रीनंतर ही संततधार पाऊस सुरूच होता.
सोमवारी नगर शहरात, उपनगर, नगर तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास ही काही काळ जोरदार पाऊस झाला. त्यानंतर साडेचार वाजण्याच्या सुमारास जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे रस्त्यांवर पाणी वाहत होते. त्या पाण्यामध्ये वाहनचालक रस्ता शोधत होते.
नगर-मनमाड महामार्गावर शहरातील सावेडी येथे रस्त्यावर पाणी साचले होते. त्यातून वाहनचालकांना मार्ग शोधावा लागत होता. तर शहरातील चितळे रोड, कलेक्टर कार्यालय रस्ता, बाजारपेठ, सावेडी उपनगरातील रस्त्यांवरून पाणी वाहत होते. रात्रीनंतर नगर शहरात संततधार पाऊस सुरूच होता.
सर्वदूर पावसाचे हजेरी
नगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 107 टक्के पावसाची नोंद झाली आहे. सरासरी जास्त असली तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी पाऊस आहे. गेल्या वर्षी चार महिन्यात 176 टक्के पाऊस झाला होता.
नगर, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर या तालुक्यात शंभर टक्के पाऊस झाला आहे. तर इतर तालुक्यांत 85 ते 95 टक्के पाऊस झाला आहे. पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक 168 टक्के पावसाची नोंद झाली आहे. शेवगाव तालुक्यात 145 टक्के पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात आणखी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. जून ते सप्टेंबर असे चार महिने पाऊस मोजला जातो. परंतु जिल्ह्यातील दक्षिण भागातील सर्वच तालुक्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात पाऊस होत असल्याने आणखी पावसाची शक्यता आहे.