पुणे – घर बांधण्याकरिता विवाहितेकडे पैशांची मागणी करून तिला भोंदूबाबाच्या सांगण्यावरून कोंबडीचे रक्त पाजून मारहाण केली.
पती अमित सुदाम वाघुले (33), सासरा सुदाम श्रीपती वाघुले (62), आणि सासू संध्या वाघुले (53) यांच्याविरोधात याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंग, स्त्री अत्याचार व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. हा प्रकार डिसेंबर 2018 ते जून 2021 दरम्यान घडला.
संबंधित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तीन वर्षांपूर्वी संबंधित महिलेचे अमित वाघुले याच्याशी लग्न झाल्यानंतर ती पतीसह सासरी राहात होती. लग्नावेळी अमितने अभियंता असल्याचे सांगितले परंतु नंतर त्याचे पदवीपर्यंतचे ही शिक्षण पूर्ण झाले नसल्याचे उघड झाले.
लैंगिक दृष्ट्या पती सक्षम नसल्याचे माहिती असूनसुद्धा सासरच्या व्यक्तींनी त्याचे विवाहितेशी लग्न लावून दिले. सासऱ्याने तिचा विनयभंगाचा प्रकार केला. याबाबत तिने तिच्या माहेरी तक्रार केली असता, तिला सासरच्या व्यक्तींनी मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ केला. रत्नागिरी येथे घर बांधण्यासाठी पैशांची मागणी तिच्याकडे करत खेड तालुक्यातील कनेरसर येथील एका भोंदूबाबाच्या सांगण्यावरून तिला कोंबडीचे रक्त पाजले.