रायबरेली – उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी या सध्या दोन दिवसांच्या रायबरेली दौऱ्यावर आल्या आहेत. रायबरेली हा सोनिया गांधी यांचा मतदार संघ आहे. तेथून त्या लोकसभेवर निवडून आल्या असल्या तरी गेल्या अनेक महिन्यात त्यांना प्रकृतीच्या कारणामुळे रायबरेलीचा दौरा करता आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर प्रियांकांनी तेथे मोर्चा सांभाळला आहे.
लखनौ- रायबरेली सीमेवरील चुरूवा येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी या दौऱ्याला प्रारंभ केला. रायबरेलीतील पक्ष कार्यकर्त्यांशी त्या चर्चा करीत आहेत. विविध गावांतील कॉंग्रेस शिष्टमंडळांना त्यांनी चर्चेसाठी पाचारण केले आहे. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू राहील असे उत्तरप्रदेश कॉंग्रेसच्या मीडिया विभागाच्या प्रियांका गुप्ता यांनी सांगितले.
या मतदार संघातील बछरावन, हरचंदपूर, जगदीशपूर या गावांना त्यांनी भेटी दिल्या तसेच रायबरेली शहरातील सिव्हील लाईन्स भागालाही त्यांनी भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला.