नवी दिल्ली – दिल्लीत बोगस कॉल सेंटर उघड करून बेरोजगारांना लुबाडणारे आणखी एक रॅकेट पोलिसांनी उघडकीला आणले असून त्याच्याशी संबंधित तेरा जणांना गजाआड करण्यात आले आहे. नेब सराईच्या देवली भागात हे कॉल सेंटर चालवले जात होते.
विविध जॉब पोर्टल्सच्या सहायाने हे लोक गरजू युवकांना हेरत असत आणि त्यांना विविध जॉब एजन्सींज मार्फत नोकऱ्या लावण्याचे आमिष दाखवून त्यांना लुबाडत असत. नोकऱ्यांच्या आमिषामुळे बेरोजगार युवकही त्यांच्या या जाळ्यात सहज फसत असत.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या कॉल सेंटरशी संपर्क केल्यानंतर त्यांना कोणाचाच प्रतिसाद मिळत नसे. पोलिसांना या अनुषंगाने अनेक तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी त्याचा छडा लावला आणि काल गुरुवारी रात्री या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला.
त्यावेळी तेथे काम करणाऱ्या काही महिला कर्मचाऱ्यांसह कॉल सेंटरच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून 19 मोबाइल फोन आणि 14 रजिस्टर ताब्यात घेण्यात आली आहेत.