मुंबई – आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने जय्यत तयारी सुरू केली आहे. राजकीय व्युहरचना रचण्यासाठी राष्ट्रवादीकडून बैठकांचा धडाका सुरू आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने तीन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणूक २०२४ ची तयारी सुरू केल्याचं दिसतयं.
शरद पवारांच्या उपस्थित गेल्या विधानसभा निवडणकीत राष्ट्रवादीकडून तिकीट देण्यात आलेल्या ११४ उमेदवारांची बैठक घेण्यात आली. यावेळी आजी-माजी आमदारांसह मंत्रीही उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत प्रत्येक मतदार संघाचा आढावा घेण्यात आला. तसेच तेथील नेत्यांची तक्रारी आणि सूचना समजून घेतल्या.
या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं की, 2019च्या निवडणुकीत 114 उमेदवारांना तिकीट दिलं होतं. त्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीला खासदार, मंत्रीही उपस्थित होते. यावेळी एकूण 55 लोकांनी आपली मते मांडली. मतदारसंघातील परिस्थिती, तिथले प्रश्न आदी मुद्दे त्यांनी बैठकीत मांडले. तसेच सरकारकडून असलेल्या अपेक्षाही व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी आमदारांची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडत आहे.@PawarSpeaks #NCP #meeting pic.twitter.com/RGltqwAaOk
— NCP (@NCPspeaks) September 8, 2021
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र राष्ट्रवादीने आजी-माजी आमदारांच्या बैठका घेऊन २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे.