जमैका – नवोदित डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने 43 धावांत घेतलेल्या 4 बळींच्या जोरावर पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा दुसऱ्या कसोटी सामन्यात 109 धावांनी पराभव केला. या विजयाच्या जोरावर पाकिस्तानने दोन सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 329 धावांचे आव्हान वेस्ट इंडिजला पेलवले नाही व त्यांचा डाव 219 धावांत संपला. चौथ्या दिवसअखेर त्यांनी 1 बाद 49 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र, अखेरच्या दिवशी त्यांना आणखी 280 धावा करता आल्या नाहीत.
वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने 47 धावांची एकाकी लढत दिली. दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवण्यात पाकिस्तानला यश आले. पहिल्या डावात सहा बळी मिळवणाऱ्या आफ्रिदीने दुसऱ्या डावात 4 गडी बाद करत या सामन्यात एकूण 10 बळी मिळवले. तोच या सामन्याचा तसेच मालिकेचा मानकरी ठरला.