पुणे, दि. 27 – महाराष्ट्र मंडळ, बेंगळुरूच्या क्रीयाशील सदस्य आणि मराठी भाषकांसाठी लिहिलेल्या “कन्नड शिका’ या पुस्तकाच्या लेखिका सरस्वती रिसबूड यांचे बेंगळुरू येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
गेल्या दोन-तीन दशकांत बेंगळुरूमध्ये नव्याने आलेल्या हजारो मराठी मंडळींना या पुस्तकामुळे व्यावहारिक कन्नड भाषा शिकता आली. रिसबूड यांनी मराठी-कन्नड अनुवादक म्हणूनही कार्य केले आहे. वर्ष 1993 मध्ये अनुवादासाठी प्रथमच दिला गेलेला साहित्य अकादमीचा पहिला पुरस्कार त्यांच्या “रामायणातील शाप आणि वर” ह्या पुस्तकाच्या भाषांतराला मिळाला होता.
मराठीतील “युगांत’, “जेव्हा माणूस जागा होतो’, “स्त्री-पुरुष’ ही पुस्तके त्यांनी कानडीत आणली. तसेच “देवरु’ ही कन्नड कृती मराठीत अनुवादीत केली. कर्नाटक शासनानेसुद्धा त्यांच्या अनुवादित साहित्य कार्याचा वेळोवेळी गौरव केला.
आपल्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव गेल्याच वर्षी साजऱ्या केलेल्या बेंगळुरूच्या महाराष्ट्र मंडळानेही “अभिमान” पुरस्काराने सरस्वती रिसबूड यांचा सन्मान केला होता. रिसबूड यांच्या निधनाने मराठी-कन्नड साहित्य विश्वातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे, अशा शब्दांत अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.