औंध – बाणेर रस्त्यावरील पावसाळी वाहिन्यांच्या चेंबरवरील लोखंडी झाकणे चोरीला गेल्याने या रस्त्यावरील चेंबर उघडे पडले आहेत. या चेंबरची खोली मोठी असल्याने अपघाताचा धोका आहे. गेला महिनाभरापासून ही झाकणे चोरी होत आहेत. पोलीस तसेच पालिका प्रशासनाने चोर पकडण्याची मोहीम हाती घेतली असली तरी त्यांना यश आलेले नाही.
बाणेर रस्त्यावर “स्मार्ट सिटी’ अंतर्गत पदपथांचे व रस्त्याचे काम सुरू आहे. यातून वाहनचालकांना अडथळा होत असतानाच अशा चेंबरचा धोका निर्माण झाला आहे. विद्यापीठ चौक ते सदानंद हॉटेलपर्यंत चेंबरवरील लोखंडी जाळ्या चोरीला गेल्या आहेत. काही ठिकाणी नवीन जाळ्या बसविण्यात आल्या त्यानंतरही त्या चोरीस गेल्या आहेत. सिग्नलला उभा असलेला विनाहेल्मेट वाहनचालक कॅमेऱ्यात टिपला जातो. परंतु, सिग्नलवरील चेंबरचे झाकण चोरणारा मात्र सापडत नाही, या गोष्टीतून वाहन चालकांकडून पोलीस तसेच पालिका प्रशासनावरव नाराजी व्यक्त केली जात आहे.
चेंबरचे झाकण रात्रीच्या वेळी चोरीला जाते. सकाळी वाहनचालकांना अंदाज न आल्यामुळे या ठिकाणी अपघात घडत आहेत. बाणेर रस्त्यावर मोठी वर्दळ असते, त्यामुळे अशा ठिकाणी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. पोलिसांनी झाकण चोरांचा शोध लावावा.- विशाल विधाते,
अध्यक्ष, प्रभाग क्र. 9 राष्ट्रवादी कॉंग्रेस
चेंबरवरील झाकण चोरी प्रकरणी चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये महापालिकेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. बाणेर परिसरातील रस्त्यांवर हे प्रकार घडत असल्याने ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीतील रेकॉर्डिंगवरून चेंबरवरील झाकण चोरणाऱ्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आपले काम करीत आहेत. भविष्यात रस्त्यांवरील चेंबरवर ठिकठिकाणी लोखंडी जाळीऐवजी सिमेंटची झाकणे बसविण्यात येतील. जेणेकरून पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. – संदीप चाबुकस्वार,
कनिष्ठ अभियंता, पथ विभाग, पालिका