वडगावशेरी – करोना काळात नागरिकांना स्वच्छ हवा आणि ऑक्सिजनचे महत्त्व कळल्याने विविध ठिकाणी महानगरपालिकेतर्फे ऑक्सिजन पार्कची उभारणी करण्यात आली, याचे सर्वत्र स्वागतही झाले. परंतु, पालिकेच्या ऑक्सिजन पार्क प्रवेशद्वारासमोरच कचरा टाकला जात असल्याने प्रचंड दुर्गधी पसरत आहे. यामुळे नागरिकांना नाकावर रूमाल ठेवूनच ऑक्सिजन पार्क मध्ये वावरावे लागत आहे.
खराडी येथील सर्व्हे नंबर 30 मध्ये महापालिकेने ऑक्सिजन पार्क उभारला आहे. नगरसेवक महेद्र पठारे, ऍड. भैय्यासाहेब जाधव, सजिला पठारे आणि सुनिता पठारे यांनी यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. याशिवाय हे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनीही त्याच्या आमदार निधीतून खर्च करण्याची तयारी दर्शवली, त्यानुसार कामही सुरू झाले. याचा लाभही नागरिकांना होऊ लागला होता.
मात्र, महापालिकेच्या उफराट्या कारभारातून या ऑक्सिजन पार्कच्या प्रवेशद्वारावरच कचरा साठवला जात आहे. यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटत असून या पार्कचा मूळ उद्देशच बाजूला पडला आहे. सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून याबाबत तक्रार करण्यात आल्यानंतर यूवा सेनेचे समन्वयक शिवप्रसाद जठार, राजू सावत, संघटक विनोद करताल, आशिष गायकवाड, शंकर सगम, शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख संजय भोसले, युवा सेना उपसचिव किरण साळी, विस्तारक रूपेश कदम आणि शहर प्रमुख संजय मोरे यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेत याबाबत निवेदन दिले आहे. शिवसेना स्टाइलने आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.
ऑक्सिजन पार्कसमोर कचरा, ही बाब निश्चितपणे गंभीर आहे. तेथील कचरा हटविण्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून तातडीने कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे. – सुहास जगताप, सहाय्यक आयुक्त, महापालिका, नगररोड विभाग