पुणे –बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन परस्पर नावावर करून घेत तब्बल 2 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
उत्तुंग कृष्णराव पाटील (28, रा. रहाटणी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रीतम सुरेंद्र पाषाणकर (वय 44) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मे ते जून 2021 दरम्यान हिंजवडी फेज एक परिसरात हा प्रकार घडला.
आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांच्या नावावर मुळशी तालुक्यातील गोडांबेवाडी येथे असलेल्या जमिनीचे परस्पर बनावट व्यक्ती उभ्या करून, बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून तसेच खोट्या सह्या करून साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र तयार करून घेतले. तसेच खरेदीखत तयार करून परस्पर ही जमीन उत्तुंग पाटील याच्या नावावर करून घेतली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पाटील याला अटक करून मंगळवारी (दि.17 ) न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. बनावट व्यक्ती कोण होत्या?, बनावट कागदपत्रे कोठे तयार करून घेतली?, त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.