नवी दिल्ली – देशात काल करोना रूग्णांची नीचांकी नोंद झाल्याची सुवार्ता आहे. गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 28 हजार 158 नवीन करोना रूग्ण आढळून आले आहेत. ही गेल्या 147 दिवसांतील नीचांकी संख्या आहे.
देशातील सक्रिय बाधितांच्या संख्येतही घट झाली असून ही संख्या आता 3 लाख 88 हजार 508 वर आली आहे. हा सुद्धा गेल्या 139 दिवसांतला सर्वात नीचांकी आकडा आहे असे आरोग्यमंत्रालयाने म्हटले आहे.
दरम्यान देशातील कोविडचा राष्ट्रीय रिकव्हरी रेट 97.45 टक्के इतका झाला आहे. काल दिवसभरात एकूण 373 करोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे करोनामुळे दगावलेल्यांची संख्या आता 4 लाख 28 हजार 682 इतकी झाली आहे. काल दिवसभरात करोनाच्या एकूण 15 लाख 11 हजार 313 चाचण्या घेण्यात आल्या. देशात काल अखेर पर्यंत एकूण 51 कोटी 45 लाख लोकांना किमान एक डोस तरी देण्यात आला आहे.