नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आणखी पूर्णपणे कमी झाला नाही. करोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. दरम्यान, करोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी देशातील मंदिरांना आणखीनही टाळे ठोकण्यात आले आहेत. मात्र या नियमाला पायदळी तुडवत मध्यप्रदेश मध्ये मंदिरात शेकडो भाविकांनी एकच गर्दी केल्याचे समोर आले आहे.
मध्य प्रदेशमध्ये करोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे. करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यांत मंदिर बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र याच दरम्यान मंदिरातील गर्दीचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
#WATCH | A stampede-like situation was seen at Mahakaleshwar Temple in Ujjain, Madhya Pradesh yesterday pic.twitter.com/yxJxIYkAU5
— ANI (@ANI) July 27, 2021
मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात सोमवारी मोठी गर्दी झाली होती. यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होऊन अनेक महिला आणि लहान मुलं यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मंदिरात उपस्थित असलेल्या काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात दर्शन घेण्यासाठी काही व्हिआयपी मंडळी आली होती. याच दरम्यान लोकांनी देखील मोठी गर्दी केली. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उमा भारती यांच्यासह अनेक नेते मंडळी आली होती.
मंदिरातील गर्दीचा आणि झालेल्या चेंगराचेंगरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मंदिराच्या गेट नंबर 4 मधून काही भाविक हे धक्का-बुक्की करत आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. ज्यामुळे काही काळ गोंधळाचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परिस्थिती नियंत्रणात आणणाऱ्या पोलिसांसोबत देखील धक्काबुक्की करण्यात आल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.