टोकियो – भारताची उदयोन्मुख महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्राने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत अत्यंत अविश्वसनीय कामगिरी करताना महिला एकेरीची तिसरी फेरी गाठली. ऑलिम्पिक स्पर्धेच्या महिला एकेरीच्या टेबलटेनिस स्पर्धेची तिसरी फेरी गाठणारी मनिका भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे.
मनिकाने रविवारी झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात युक्रेनच्या मार्गारेटा पेसोत्स्काचा पराभव केला. मनिकाने पहिले दोन सेट गमावल्यानंतरही अविश्वसनीय पुनरागमन केले. हा सामना मनिकाने 4-3 (4-11, 4-11, 11-7, 12-10, 8-11, 11-5, 11-7) असा जिंकला. त्यापूर्वी शनिवारी पहिल्या सामन्यात तिने ब्रिटनच्या टिन-टिनचा 4-0 असा पराभव केला होता. दरम्यान, मिश्र दुहेरीत मात्र, मनिकाला अचंता शरत कमलसह खेळताना पराभवाचा सामना करावा लागला.
मनिका-अचंता जोडीला चिनी-तैपेईच्या लिन आणि चेंग जोडीने 8-11, 6-11, 5-11, 4-11 असे पराभूत केले. तसेच पुरुष गटात जी. साथियानला दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत 95 व्या स्थानावर असलेल्या हॉंगकॉंगच्या लॅम या खेळाडूने पराभूत केले. साथियानने पहिला सेट 11-7 असा जिंकला होता.
मात्र, त्यानंतर दुसरा सेट 7-11 असा गमावला. यानंतर लॅमने सलग तिन सेटसह सामनाही जिंकला. लॅमने हे तीनही सेट 11-9, 12-10,11-6 असे जिंकले. साथियानच्या पराभवानंतर टेबल टेनिसमधील पुरुषांच्या गटातील भारताचे आव्हान संपुष्टात आले.