बुलडाणा – राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र अद्याप दुसरी लाट आटोक्यात आलेली नाही. राज्यातील नवीन रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यातच आता बुलडाणा जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याचं वृत्त आहे.
बुलडाणा जिल्ह्यात आज पुन्हा 35 रुग्ण करोनाबधित आढळलेत. त्यामुळे पुढील काळात जिल्हा हॉटस्पॉट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे करोना नियम पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
सध्या जिल्हा पहिल्या स्टेपमध्ये असल्यामुळे निर्बंध उठविण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेला 24 तास मुभा असून सर्वच दुकानांना आपली दुकाने आता 4 वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मुभा जिल्हा प्रशासनाने दिलीय. त्यामुळे बाजारात होणारी गर्दी, करोना नियमाचे उल्लंघन करणे, आठवडी बाजारात मास्क न वापरणे यामुळे रुग्णासंख्या वाढतच आहे.
मागील 5 दिवसांत 10 जुलै रोजी 77 रुग्ण आढळले, 9 जुलै रोजी 22 रुग्ण, 8 जुलै रोजी 8 रुग्ण , 7 जुलैरोजी 118 रुग्ण आढळले आहेत. 6 जुलैला 13 रुग्ण आणि 5 जुलैला 45 रुग्ण बाधित आढळले आहेत.